अमेरिकेचं चीन विरोधात मोठं पाऊल, चीनची भारताकडून अपेक्षा !

जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये आता थेट आर्थिक लढाई सुरु झाली आहे. अमेरिकेने चीन विरोधात एक मोठ पाऊल उचललं असल्याचं दिसतंय.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी धमकी दिली. नंतर थेट व्हाइट हाऊसने चीनवर 104 टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. हे आयात शुल्क 9 एप्रिलपासून म्हणजेच आजपासून लागू होणार आहे. अमेरिकेच्या या निर्णयाकडे दोन्ही देशातील नव्या आर्थिक युद्धाची सुरुवात म्हणून पाहिलं जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात त्यांनी म्हटलेलं की, चीनने अमेरिकेवर लावलेला 34 टक्के टॅरिफ मागे घेतला नाही, तर अमेरिका सुद्धा त्यांच्यावर 50 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावेल. आता व्हाइट हाऊसने आपली धमकी प्रत्यक्षात आणली आहे. अमेरिकेने चिनी सामानाच्या आयातीवर थेट 104 टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. हा निर्णय 9 एप्रिलपासून लागू होईल, असं व्हाइट हाऊसकडून सांगण्यात आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलय की, “जो कुठला देश अमेरिकेविरुद्ध प्रत्युत्तराची कारवाई करेल, त्यांच्याविरुद्ध तात्काळ प्रभावाने नवीन आणि आधीपेक्षा जास्त कठोर टॅरिफ लावला जाईल” “आम्ही आधीच स्पष्ट केलेलं की, व्यापारात भेदभाव सहन करणार नाही. आता वेळ आलीय, चीनने आपल्या धोरणांचा पुनर्विचार करावा आणि अमेरिकेसोबत चांगला व्यवहार करावा” असं देखील डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.
अमेरिका आणि चीनमधील प्रस्तावित बैठका स्थगित केल्याचही ट्रम्प यांनी सांगितलं. ज्या देशांनी व्यापारी चर्चेची मागणी केली आहे, त्यांच्यासोबत अमेरिका चर्चा सुरु करेल असही ते म्हणाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे जागतिक व्यापारावर परिणाम होईल तसच चीनसोबत अमेरिकेच्या संबंधात आणखी तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
चीनकडून अमेरिकेच्या या निर्णयावर अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. बीजिंग लवकरच यावर प्रतिक्रिया देईल असं बोललं जातंय. चीन सुद्धा अमेरिकेच्या या टॅरिफ निर्णयाविरोधात कठोर पावलं उचलू शकतो. त्यामुळे जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापार युद्ध आणखी तीव्र होणार आहे. सहाजिकच याचा जागतिक व्यापारावर, गुंतवणूकीवर परिणाम देखील होणार आहे.
चीनची भारताकडून अपेक्षा
चीन यावर काय प्रतिक्रिया देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मोठ्या टॅरिफमुळे केवळ चीनच्या अर्थव्यवस्थेलाच झटका बसेल असं नाही तर दोन्ही देशांमध्ये एक नवं व्यापार युद्ध उद्भवण्याची शक्यता आहे.
डोनाल्ड ट्रम्पकडून झटका मिळाल्यानंतर आता चीनची भारताकडून अपेक्षा आहे. चिनी दूतावासाचे प्रवक्ते यू जिंग यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की “ट्रम्प प्रशासनाने लादलेल्या आयात शुल्कामुळे निर्माण झालेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी भारत व चीनने एकत्र आलं पाहिजे. चीन-भारत आर्थिक व्यापारी संबंध परस्पर फायद्यांवर आधारित आहेत. अमेरिका आयात शुल्काचा गैरवापर करत असल्याने आपल्यासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. या अडचणींना तोंड देण्यासाठी विकसनशील देशांनी एकत्र उभं राहिलं पाहिजे.” असंही त्यांनी म्हटलंय.
भारतातील चीनच्या एम्बसीचे प्रवक्ता यू जिंग म्हणाले, चीन आणि भारत दोन्ही विकसनशील देश आहेत आणि अशात अमेरिकेने टॅरिफसारखे पाऊल उचलल्याने दक्षिणेकडून देशाच्या विकासाचा अधिकार हिरावण्याचा प्रयत्न आहे. ते म्हणाले की, भारत आणि चीनने एकत्र येत या आव्हानांचा सामना करायला हवा. जगभरातील शेअर बाजारात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. तेलाच्या किमती $60 प्रतिबॅरेलपर्यंत कोसळली आहेत.
याचा परिणाम आशियाई बाजारावरही दिसतोय. जपानचा शेअर बाजार 3 टक्क्यांनी घसरलाय. जगभरात आर्थिक अस्थिरता निर्माण होत आहे. भारत आणि चीनमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावला आहे. त्यात आता अमेरिकेकडून चीनवर आणखी मोठा टॅरिफ बॉम्ब टाकण्यात आला आहे. ज्यामधून जागतिक बाजारपेठेमध्ये व्यापार युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मात्र अमेरिकेच्या या निर्णयानंतर चीनच्या अधिकृत प्रतिक्रियाकडे अख्या जगाची नजर लागलीय.