महाराष्ट्रात बारावीचे निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी!

आज महाराष्ट्रात बारावीचे निकाल जाहीर झाले असून राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालात ६ लाख २५ हजार ९०१ मुली, तर ६ लाख ७६ हजार ९७२ मुले उत्तीर्ण झाली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९४.५८ टक्के, तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.५१ टक्के आहे. यावर्षीही मुलींनी बाजी मारल्याचे यातून दिसून येत आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी १.४९ टक्के निकाल कमी लागला आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.

या जाहीर झालेल्या निकालात बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले.

बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर २०२४ रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. हत्येनंतर तपासासाठी आंदोलन, घरात लहान भाऊ, रडणारी आई, लढणारा काका असे सगळे चित्र असतानाही संतोष देशमुख यांची लेक वैभवी देशमुखने बारावीला चांगला अभ्यास करत घवघवीत यश मिळविले आहे. आज बारावीचा निकाल लागला असता वैभवीला ८५.१३ टक्के गुण मिळाल्याचे समोर आले.

संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले होते. फरार आरोपींची काही दिवस अटक झाली नाही. तसेच या प्रकरणात रोज नाट्यमय घडामोडी घडत होत्या. अशात वैभवी देशमुख आपले काका धनंजय देशमुख यांच्यासह खंबीरपणे उभी राहिली. लहान भाऊ आणि आईला सावरत ती आंदोलनातही हिरीरीने सहभागी होऊन आपल्या वडिलांसाठी न्याय मागत होती.

परीक्षेच्या काळातही वैभवी देशमुखचा संघर्ष आणि दौरे थांबलेले नव्हते. वडिलांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होत नाही, तोपर्यंत हा लढा थांबविणार नाही, असा निर्धार केलेल्या वैभवीने अशातच परीक्षा दिली आणि त्यात चांगले यशही मिळवले आहे. तिचे हे यश पाहायला आज वडील असायला हवे होते, अशी भावना मस्साजोगचे ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

यावर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालाचा टक्का १.४९ ने यंदा कमी झाला आहे. या वर्षी कॉपी विरोधात कडक मोहिम राबवली होती. यामुळे निकाल कमी लागल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

“राज्यात ११ फेब्रुवारी ते मंगळवार,१८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होत्या. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती. ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली, ३७ ट्रान्सजेंडर. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती, तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

विभागनिहाय निकाल

पुणे-९१.३२ टक्के

कोकण- ९६.७४ टक्के

नागपूर- ९१.३२ टक्के

छत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्के

मुंबई- ९२.९३ टक्के

कोल्हापूर- ९३.६४ टक्के

अमरावती- ९१.४३ टक्के

नाशिक – ९१.३१ टक्के

लातूर – ८९.४६ टक्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *